---Advertisement---

सावरोली शाळेतील विद्यार्थ्यांनी बनवले 20 हजार सीड बॉल

By
On:
Follow Us

ठाणे,- पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी व संवर्धन करण्यासाठी शहापूर तालुक्यातील जिल्हा परिषद सावरोली बुद्रुक शाळा पुढाकार घेत आहे. विद्यार्थ्यांच्या दुसऱ्या सत्राची परीक्षा संपल्यानंतर सीड बॉल (Seed Ball) बनवण्याचा एक अनोखा उपक्रम हाती घेऊन तब्बल 20 हजार सीड बॉल तयार केले आहेत.

विविध बिया, माती, शेणखतापासून तयार करण्यात आलेल्या सीड बॉल कृषी दिनानिमित्त शहापूर तालुक्यात गटविकास अधिकारी भाऊसाहेब रेंगडे यांच्या हस्ते मातीत विविध ठिकाणी टाकण्यात आले.

शाळेतील पटसंख्या 74 असून, विद्यार्थ्यांना निसर्गा विषयी प्रेम आत्मीयता जागृत करणे. पर्यावरण आणि मनुष्य यांचा सहसंबंधाची जाणीव करून देण्याच्या उद्देशाने ह्या उपक्रमाची संकल्पना ह्या शाळेतील शिक्षिका पूनम रवींद्र उबाळे यांची असून यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. शाळा सुरू झाल्यावर गटागटा मधून सीड बॉल जमा करण्यात आले असून सर्वाधिक सीड बॉल बनवणाऱ्या गटाला बक्षीस देऊन गौरवण्यात आले आहे.

या उपक्रमासाठी गटविकास अधिकारी भाऊसाहेब रेंगडे, गटशिक्षणाधिकारी भाऊसाहेब चव्हाण, विस्तार अधिकारी डॉ. प्राजक्ता राऊत, केंद्रप्रमुख मनीषा जटाळ, वनक्षेत्र अधिकारी शैलेश गोसावी यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच शाळेचे मुख्याध्यापक मनोज गोंधळी, सहशिक्षक अरुणा शेलार, विजयकुमार उदार, सरपंच रोहन चौधरी, उपसरपंच शुभम चाभरे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बेबी सोंगाळ, सर्व पालक व ग्रामस्थ यांनी सहकार्य केले आहे.

जिल्हा परिषदेच्या शाळा या मोकळ्या जागेत असतात. शाळेच्या आजूबाजूला बरीच बोर, चिंच, जांभूळ, साग यांची झाडे असतात. यांच्या बिया सहज विद्यार्थ्यांना उपलब्ध होऊ शकतील आणि कमी पावसातही सहज रुजतील म्हणून या बियांची निवड करण्यात आली. या उपक्रमाचा प्रमुख भाग म्हणजे माझ्याकडे उपलब्ध असलेले मनुष्यबळ माझे विद्यार्थी. विद्यार्थ्यांच्या सहकार्यामुळे उपक्रम यशस्वी करण्यासाठी मदत मिळाली. – शिक्षिका पूनम रवींद्र उबाळे

पहिल्यांदा असा उपक्रम शाळेत करण्यात आल्याने खूप उत्सुकता लागली होती. बियांपासून सीड बॉल बनवणे ही एक भन्नाट कल्पना  होती. आपण नेहमी फळे खातो व बिया टाकून देतो आता मात्र उपक्रम सुरू झाल्याने बिया गोळा करून ठेवतोय. – विद्यार्थी तन्मेश पंढरीनाथ लुटे

For Feedback - feedback@example.com
Join Our WhatsApp Channel

Leave a Comment