ठाणे – साथींच्या आजारांच्या प्रादुर्भावामुळे जनावरांचे मृत्यू होण्याची शक्यता असल्याने जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडून साथीचे आजार रोखण्यासाठी विशेष मान्सूनपूर्व लसीकरण मोहीम राबविण्यात येत असते.
जिल्ह्यातील 4 लाख 66 हजार 450 पशुधनाला घटसर्प आणि फऱ्या, घटसर्प, फऱ्या, आंत्रविषार, लम्पी चर्म रोग, लाळ खुरकत रोग, PPR प्रतिबंधक लस टोचण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. 1 एप्रिल पासून लसीकरण अभियान सुरू करण्यात आले होते. लसीकरण अभियानात पशुसंवर्धन विभागाचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, पशुधन विकास अधिकारी आणि पशुधन पर्यवेक्षकांनी भाग घेतला होता.
जिल्ह्यात घटसर्प आणि फऱ्या 40050 लसीकरण, घटसर्प 56000 लसीकरण, फऱ्या 28000 लसीकरण, लम्पी चर्म रोग 63600 लसीकरण, आंत्रविषार 39500 लसीकरण, लाळ खुरकत रोग 177200 लसीकरण, PPR 62100 असे एकूण 4 लाख 66 हजार 450 लसमात्राचे मान्सूनपूर्व लसीकरण करण्यात आले आहे.
राज्य पातळीवर झालेल्या विसाव्या पशुगणनेच्या आकडेवारीनुसार ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे 2 लाख 39 हजार 281 पशुधन आहे. यांपैकी 1 लाख 75 हजार 947 गाय आणि म्हैस, तर 63 हजार 334 शेळ्या आणि मेंढ्या आहेत. पावसाळ्यातील दमट वातावरण आणि अन्य कारणांमुळे शेतकऱ्यांच्या जनावरांना घटसर्प, फऱ्या, आंत्रविषार, लम्पी चर्म रोग, लाळ खुरकत रोग, PPR सारख्या साथींच्या आजारांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता अधिक असते. साथींच्या आजारांच्या प्रादुर्भावामुळे जनावरांचा मृत्यू होण्याची शक्यता असल्याने पशुसंवर्धन विभागाकडून साथीचे आजार रोखण्यासाठी विशेष मान्सूनपूर्व लसीकरण मोहीम राबविण्यात आली आहे.
जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत 1 एप्रिल पासून मान्सून पूर्व लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली होती. या कालावधीत 4 लाख 66 हजार 450 जनावरांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. समीर तोडणकर यांच्या नेतृत्वाखाली 21 पशुधन विकास अधिकारी, 33 पशुधन पर्यवेक्षक आणि पशुसंवर्धन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घरोघरी जाऊन जिल्ह्यातील पशुधनाचे लसीकरणाचे काम पूर्ण केले आहे.