मुंबई: ज्येष्ठ साहित्यिक ज. वि. पवार यांनी प्रवर्तीत केलेल्या अपरान्त साहित्य कला प्रबोधिनीमध्ये कळत्या मतांच्या आणि लिहित्या हातांच्या कार्यकर्त्यांचा भरणा अधिक असल्यानं ही संघटना आपल्या ध्येय उद्दिष्टांपासून भरकटण्याचा धोका नाही, असे आश्वासक प्रतिपादन अपरान्त साहित्य कला प्रबोधिनीचे केंद्रीय कार्याध्यक्ष सद्धम्मकार प्रा. आनंद देवडेकर यांनी केशव गोरे स्मारक ट्रस्ट गोरेगाव, मुंबई येथील मृणालताई गोरे सभागृहात बोलताना केले.
अपरान्त साहित्य कला प्रबोधिनी आणि केशव गोरे स्मारक ट्रस्ट, संदर्भ ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘ पुस्तकं बोलू पाहतात काही… ‘ या मालिकेत अपरान्तचे केंद्रीय सरचिटणीस सुनील हेतकर यांच्या ‘ इस्तव ‘आणि पालघर जिल्हा अध्यक्ष भावेश लोखंडे यांच्या ‘ इन द सर्च ऑफ पिकॉक ‘ या कथासंग्रहांवर आयोजित जाहीर चर्चासत्राचे अध्यक्ष म्हणून प्रा. देवडेकर बोलत होते.
दोन्ही कथाकारांच्या कथालेखक म्हणून असलेल्या प्रतिभेचा गौरव करून प्रा. देवडेकर आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मुक्तीलढ्यातून आलेल्या परिवर्तनाचं प्रतिबिंब आमच्या साहित्यात दिसायला हवं, असं जे मी सद्धम्म पत्रिकेतून सातत्यानं मांडत आलोय त्याला साजेसं या कथासंग्रहातील लेखन पाहून मला विशेष आनंद होत आहे. साहित्य आणि साहित्यिकांच्या बदलत्या भूमिकांविषयीही या प्रसंगी परखडपणे व्यक्त होत प्रा. देवडेकर यांनी प्रश्न उपस्थित केला की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध बनवलेल्या समाजाला आमचे साहित्यिक, विचारवंत आंबेडकरी समाज का म्हणतात?असं म्हणून ते बौद्ध समाजाला ब्राह्मणी धर्माअंतर्गत स्थापन झालेल्या सुधारणावादी पंथांच्या रांगेत का आणि कुणाच्या सोईसाठी बसवत आहेत ?
चर्चासत्रात सुरवातीलाच ‘ इन द सर्च ऑफ पिकॉक ‘ कथासंग्रहाचे लेखक भावेश लोखंडे व ‘ इस्तव ‘ कथासंग्रहाचे लेखक सुनील हेतकर यांनी आपल्या कथालेखनामागील प्रेरणांविषयी मनोगत व्यक्त केलं.
या कथासंग्रहांवर भाष्य करण्यासाठी चर्चासत्रात सहभागी भाष्यकार सुप्रसिद्ध लेखिका शिल्पा कांबळे, प्रा.डॉ. अश्विनी तोरणे, व प्रा. आत्माराम गोडबोले यांनी अतिशय अभ्यासपूर्ण भाष्य करून कथासंग्रहातील जमेच्या बाजू दाखवितानाच कथालेखनातील काही उणीवांकडेही अंगुलीनिर्देश केला. काही अपरिहार्य कारणास्तव परिसंवादात सहभागी होऊ न शकल्याने अरविंद सुरवाडे यांचे लिखित भाषण नंदा कांबळे यांनी वाचून दाखवले.
अपरान्तचे संस्थापक ज्येष्ठ साहित्यिक ज. वि. पवार, दुसऱ्या सम्यक साहित्य कला संगीतीच्या अध्यक्षा आयदानकार उर्मिलाताई पवार, संदर्भ साहित्याचा स्रोत असलेले साहित्य संग्राहक रमेश शिंदे, प्रा.रवीकान्त देवगडकर, डॉ. श्रीधर पवार, सुबोध मोरे, कवी के. पुरुषोत्तम, पी.व्ही. रोकडे, अशोक चाफे, मारुती सकपाळ, चंद्रकांत घाटगे इत्यादींसह अनेक मान्यवर या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित होते.
अपरान्तच्या मुंबई उपनगर जिल्हा शाखाध्यक्ष प्रा. आशालता कांबळे यांनी प्रास्ताविक केलेल्या या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रतीक पवार यांनी केलं तर आभार प्रदर्शन केशव गोरे स्मारक ट्रस्टचे सुनील राऊत यांनी केलं.