भाईंदर (प्रतिनिधी): मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील पारंपारिक विसर्जन स्थळांसोबत निर्माण करण्यात आलेल्या कृत्रिम विसर्जन स्थळांवर तसेच नैसर्गिक तलाव, समुद्रात आणि मुर्ती स्वीकृती केंद्रांवर श्रीगणरायाच्या 2127 मूर्तींचे विसर्जन व्यवस्थितरित्या संपन्न झाले. पर्यावरणपूरक विसर्जन सोहळा साजरा करणेकामी एकूण 124 श्रीगणेश मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात करण्यात आले. प्रभाग क्रमांक 01 मध्ये नैसर्गिक तलाव/समुद्रात एकूण 96 श्रीगणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. प्रभाग क्रमांक 02 मध्ये नैसर्गिक तलावात/समुद्रात एकूण 327 श्रीगणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. प्रभाग क्रमांक 03 मध्ये नैसर्गिक तलाव/समुद्रात एकूण 505 श्रीगणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. प्रभाग क्रमांक 04 मध्ये नैसर्गिक तलाव/समुद्रात व कृत्रिम तलावात एकूण 502 श्रीगणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. प्रभाग क्रमांक 05 मध्ये कृत्रिम तलावात एकूण 08 श्रीगणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. प्रभाग क्रमांक 06 मध्ये नैसर्गिक तलावात एकूण 663 श्रीगणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. अशाप्रकारे अनंत चतुर्दशी निमित्त एकूण 2101 श्रीगणेश मूर्तींना भावपूर्ण निरोप देण्यात आला.
मिरा भाईंदर महानगरपालिका मा. आयुक्त तथा प्रशासक संजय श्रीपतराव काटकर यांनी जेसल पार्क व भाईंदर पश्चिम चौपाटी याठिकाणी भेट देऊन विसर्जन पाहणी केली. सदर पाहणी दरम्यान अतिरिक्त आयुक्त अनिकेत मानोरकर, अतिरिक्त आयुक्त संभाजी पानपट्टे, उपायुक्त (मुख्यालय) संजय दोंदे, उपायुक्त डॉ. सचिन बांगर, उपायुक्त प्रसाद शिंगटे, शहर अभियंता दिपक खांबित, कार्यकारी अभियंता नितीन मुकणे, अग्निशमन अधिकारी प्रकाश बोराडे, सहाय्यक आयुक्त, इतर कनिष्ठ अभियंता, अग्निशमन कर्मचारी व महानगरपालिका कर्मचारी उपस्थित होते.
सर्वच विसर्जनस्थळांवर सुरक्षेच्या दृष्टीने बांबूंचे बॅरेकेटींग करण्यात आले होते. अग्निशमन सेवक, महानगरपालिका स्वयंसेवक यांच्यासह वैद्यकीय आरोग्य व सार्वजनिक आरोग्य सेवाही कार्यरत होते. त्याचबरोबर सर्व विसर्जन स्थळांवर पिण्याच्या पाण्याची सुविधा देखील पुरवण्यात आली होती. सर्व विसर्जन स्थळांवर कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून पोलीस यंत्रणा, सीसीटीव्ही यंत्रणा सतर्कतेने कार्यरत होती. स्वयंसेवक संस्था, शैक्षणिक संस्था, एनएसएस/एनसीसी विद्यार्थी, प्राथमिक व माध्यमिक विद्यार्थी यांनी चौपाटीवर व्यवस्थितरीत्या गर्दीचे नियोजन केले. अनंत चतुर्दशी दिवशी विसर्जन सोहळा सुव्यवस्थित रितीने संपन्न होण्यासाठी 01 ते 06 प्रभाग समिती कार्यालय क्षेत्रात सर्व यंत्रणा सुसज्ज होत्या. सहाय्यक आयुक्त, महानगरपालिका अधिकारी तसेच कर्मचारी, पोलीस प्रशासन, शैक्षणिक संस्था, एनएसएस विद्यार्थी, प्राथमिक व माध्यमिक विद्यार्थी यांनी अनंत चतुर्दशी व इतर विसर्जन सोहळ्यानिमित्त केलेल्या नियोजनाचे मा. आयुक्त यांनी समाधान व्यक्त करत सर्व अधिकारी व कर्मचारी वृंद यांचे आभार व्यक्त केले. तसेच शहराचे मा. आमदार, माजी आमदार, माजी नगरसेवक/नगरसेविका, सर्व नागरिकांनी, गणेश भक्तांनी, गणेश मंडळांनी, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया यांनी मिरा भाईंदर महानगरपालिका प्रशासनास अनंत चतुर्दशी दिवशी व इतर विसर्जन सोहळ्यात उत्कृष्ट सहकार्य केल्याने आयुक्त तथा प्रशासक संजय श्रीपतराव काटकर यांनी सर्व नागरिकांचे आभार व्यक्त केले.