---Advertisement---

बहुजन समाजाची राजकीय दिशा आणि दशा

By
On:
Follow Us

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. त्या अनुषंगाने राजकारण करणारा प्रत्येक पक्ष कामाला लागला असून तिकीट नाकारलेले नेते पक्षनिष्ठा व विचार सोडून आमदारकीच्या तिकिटासाठी इकडून तिकडे पळापळ करू लागले आहेत. मोठ्या पक्षात तिकीट न मिळालेल्यांचा ओढा वंचित बहुजन आघाडी व बहुजन समाज पक्षाकडे असल्याचे दिसते. या पक्षांची पारंपरिक मतपेढी आणि स्वत:च्या प्रभावाखालील मतदारांची मते मिळवून निवडणुक जिंकू असे या आयारामांना वाटत असते. तर आपल्या पक्षाच्या मतांची टक्केवारी वाढेल हे गृहीत धरून हे पक्षही त्यांना तिकीट देतात. होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये बसपा व वंचित आघाडीने २०० हून अधिक जागांवर उमेदवार दिले असून अन्य बहुजन आंबेडकरी पक्षसुद्धा स्वतंत्ररीत्या व आघाडी करून निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत.

महाराष्ट्रात महाविकास आघाडी व महायुती या दोन मुख्य दोन आघाड्या असून तिसरी आघाडी म्हणून वंचित बहुजन आघाडीचे नाव घेता येते. नुकत्याच झालेल्या लोकसभा २०२४ च्या निवडणुकांची आकडेवारी बघितल्यास व जनतेचा कल लोकसभेच्या निकालांप्रमाणेच राहिल्यास महाविकास आघाडी महाराष्ट्रात स्वबळावर सरकार स्थापन करण्याच्या स्थितीत येऊ शकते. परंतु हे तथ्यसुद्धा खरे नाही कारण छत्तीसगड व हरियाणा येथील विधानसभा निवडणूक निकालापूर्वी सर्वत्र काँग्रेसच्या विजयाची खात्री व्यक्त केली जात असताना प्रत्यक्षात निकाल वेगळेच लागले. त्यामुळे महाराष्ट्राचे विधानसभा निकालसुद्धा धक्कादायक असू शकतात.

आज बहुजन समाजाची राजकीय दिशा आणि दशा अतिशय दयनीय असल्याने समाज हा दिशाहीन झाला आहे. परिणामी महाराष्ट्रातील बहुजन मतदार हा आंबेडकरी नेत्यांच्या राजकारणाला व भूमिकांना कंटाळल्याचे दिसते. बहुजन आंबेडकरी नेते हे बहुजन सामाजाचे हित व त्यांचा विकास याचा विचार न करता त्याविरोधी भूमिका घेऊन केवळ स्वत:चे हित जपण्याला अधिक प्राधान्य देताना दिसतात. त्यामुळे आंबेडकरवादी वर्ग हा तथाकथित नेत्यांच्या विरोधात भूमिका घेऊन कोणत्या पक्षाला मतदान केले पाहिजे याचे स्पष्ट आवाहन जनतेस करू लागला आहे. राजकीय दृष्ट्या आंबेडकरी नेत्यांनी चिंतन व मनन करण्याची गरज असताना पक्षकार्यकर्ते बुद्धिवंताना झोडण्याची व मारण्याची धमकी देत समाजमाध्यमांवर पोस्ट करण्याचा प्रकार निदानिय आहे.

लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकामधील बहुजन आंबेडकरी राजकारणाची स्थिती फार गुंतागुंतीची आहे. महाराष्ट्रातील अनेक विधानसभा मतदार संघात बहुजन व फुले आंबेडकरी मतदारांची संख्या लक्षणीय असून अन्य कोणाला जिंकवायचे वा हरवायचे यावर त्यांचे व्होट हे निर्णायक ठरत असते. परंतु नेत्यांना वाया जाणाऱ्या मतांचा फायदा आपल्या विकासासाठी करून घेता येत नाही. हे एक दुर्दैवच आहे. समाजाच्या सांस्कृतिक, आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक विकासासाठी केवळ राजकीय प्रतिनिधित्वाचीच गरज आहे की एकत्रित व्होटबँकेची यावर चर्चा करण्यास राजकीय नेते व बुद्धिवादी वर्ग तयार असल्याचे दिसत नाही. वास्तविक अशा मुद्द्यांना बगल देणे हे आत्मघात करण्यासारखे आहे. कारण आजच्या बदलत्या भारतात देवाण-घेवाणीच्या कुटनीतीतूनच आपले हित साध्य करता येवू शकते. याचा अर्थ बहुजन आंबेडकरी पक्ष विसर्जित केले जावेत, असा नसून उलट राजकीय तडजोडीसाठी ते अधिक सक्षम केले जाणे गरजेचे आहे.

For Feedback - feedback@example.com
Join Our WhatsApp Channel

Leave a Comment