शिवसेना उमेदवार शायना एन.सी यांच्याबाबत केले होते अवमानजनक वक्तव्य
मुंबई : उबाठा गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी शिवसेना मुंबादेवी मतदार संघातील उमेदवार शायना एन.सी यांच्या विरोधात केलेल्या अवमानजनक वक्तव्यावर नागपाडा पोलीस स्टेशनमध्ये आज भारतीय न्याय संहितेच्या कलन ७९ आणि कलम ३५६/२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. अरविंद सावंत यांच्या अवमानजनक वक्तव्याची शिवसेनेने गंभीर दखल घेत पोलिसात तक्रार केली. त्यानंतर अरविंद सावंत यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
आज लक्ष्मीपुजनाचा दिवस आहे. मला राजकारणात २० वर्ष झाली. मी महिला आहे, माल नाही. कोणत्याही महिलेविरोधात अपशब्द वापराल तर महिला शांत बसणार नाही, असा इशारा शायना एन.सी यांनी दिला. मुंबादेवीच्या आशिर्वादाने मी मुंबईकरांची सेवा करत आहेत. अरविंद सावंत आणि उबाठा गटाची महिलाविरोधी मानसिकता यातून दिसून आली, अशी टीका शायना एन.सी यांनी केली. एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यात महिला सक्षमीकरणासाठी लाडकी बहिण योजना राबवत आहेत. महिलांचा मान सन्मान करणे ही आपली संस्कृती आहे, मात्र अरविंद सावंत यांनी अश्लाघ्य शब्दांत महिलांचा अपमान केला. ही त्यांची संस्कृती आहे का, सावंत यांच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरे, संजय राऊत, शरद पवार, नाना पटोले गप्प का असा सवाल शायना एन.सी यांनी केला.
सावंत यांच्या अवमानजनक वक्तव्यामुळे राज्यातील नारीशक्ती येत्या निवडणुकीत उबाठाला धडा शिकवेल, असे शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी सांगितले. यावेळी सावंत यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी आणि त्यांची खासदारकी रद्द करावी, अशी मागणी करणारे निवदेन महिला आघाडीकडून पोलिसांना देण्यात आले. सावंत यांच्या वक्तव्यावर उबाठा आणि आदित्य ठाकरे काय कारवाई करणार असा सवाल शीतल म्हात्रे यांनी केला.
महिला सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारने आणि राज्य सरकारकडून अनेक योजना राबवल्या जात आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेमुळे राज्यातील अडीच कोटी महिलांना लाभ झाला. मात्र महाविनाश आघाडीच्या नेत्यांना महिला म्हणजे ‘माल’ वाटत आहे. सावंत यांनी अशा प्रकारचे वक्तव्य करताना काँग्रेसचे उमेदवार अमीन पटेल बाजूला उभे राहून हसत होते यापेक्षा दुर्देवी आणि शरमेची बाब काय असू शकते, अशी टीका शायना एन.सी यांनी केली.