---Advertisement---

ओला आणि सुका कचऱ्यांचे वर्गीकरण करण्‍यासाठी जिल्ह्यात विशेष मोहिम सुरू

By
On:
Follow Us

ठाणे – आपल्‍या परिसरातील व घरातील ओला आणि सुका कचरा योग्य प्रकारे वर्गीकृत करण्यासाठी जिल्‍हयात दिनांक 8 जुलै 2024 पासून विशेष मोहिम राबवण्‍यात येत आहे. या कालावधीत विशेष मोहिम राबविण्‍याचे निर्देश राज्‍य शासनाने दिले आहेत, त्‍यानुसार जिल्ह्यातील प्रत्‍येक गावात “स्‍वच्‍छतेचे दोन रंग, ओला हिरवा, सुका निळा” या नावाने अभियान राबवण्यात येत आहे.

“स्‍वच्‍छतेचे दोन रंग, ओला हिरवा, सुका निळा” अभियान राबवण्‍यात येत असून ओला व सुका कचरा व्‍यवस्‍थापनासाठी ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन मुख्‍य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे तसेच प्रकल्प संचालक, जलजीवन मिशन अतुल पारसकर यांनी केले आहे.

स्वच्छ भारत मिशन (ग्रा) टप्पा-2 अंतर्गत डिसेंबर 2024 पर्यंत ठाणे जिल्हा (ग्रा) हागणदारीमुक्त अधिक मॉडेल करावयाचे आहे. मॉडेल झालेल्या गावात दृष्यमान शाश्वत स्वच्छता ठेवणे आणि हागणदारीमुक्त अधिक झालेली गावे मॉडेल करणे यासाठी विविध विषयाच्या अनुषंगाने गृहभेटीच्या माध्यमातून जनजागृतीसाठी विशेष अभियानाचे आयोजन करण्‍यात येत आहे.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली, प्रत्‍येक गावात 5 संवादकाची निवड करण्‍यात आली असून हे संवादक गृहभेटीतून माहिती देत आहेत. यासाठी सरपंच, उपसरंपच, ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता समिती, ग्रामसेवक, आशावर्कर, अंगणवाडी सेविका, स्वच्छाग्रही व बचत गटातील महिलांचा समावेश आहे.

ओला कचरा हिरव्या रंगाच्या डब्यात ठेवावा तसेच सुका कचरा निळ्या रंगाच्या डब्यात ठेवण्‍यासंदर्भात तसेच नियमित शौचालयाचा वापर करणे, शास्त्रयुक्त पध्दतीने घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, गोबरधन, प्लास्टिक व्यवस्थापन, सुयोग्य मैला गाळ व्यवस्थापन, सार्वजनिक शौचालय व त्याचा नियमित वापर आदि बाबत गृहभेटीतून माहिती घेण्यात येत आहे. भेटी दरम्यान शासनाच्‍या गुगल लिंकव्‍दारे कुटुंबांची फोटोसह माहिती भरण्‍यात येत आहे.

For Feedback - feedback@example.com
Join Our WhatsApp Channel

Leave a Comment