ठाणे (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्राला कल्याणकारी राज्याची पार्श्वभूमी आहे. या संकल्पनेनुसार शासन आणि प्रशासन सदैव लोककल्याणासाठी सदैव कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी आज येथे केले. येथील जिल्हा नियोजन समिती सभागृहात महसूल पंधरवडा गुणगौरव सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.रोहन घुगे, सहपोलीस आयुक्त डॉ.ज्ञानेश्वर चव्हाण, अपर पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक, अपर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये-धुळे, निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) गोपीनाथ ठोंबरे, उपजिल्हाधिकारी दीपक चव्हाण, जिल्हा पुरवठा अधिकारी विकास गजरे, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) वैशाली माने, अर्चना कदम, उपजिल्हाधिकारी सर्जेराव म्हस्के-पाटील, ठाणे प्रांताधिकारी उर्मिला पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी, उमेदच्या प्रकल्प संचालक श्रीमती छायादेवी शिसोदे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.कैलास पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.गंगाधर परगे, जिल्हा परिषद उप मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे, प्रमोद काळे, जिल्हा हिवताप नियंत्रण अधिकारी डॉ.संतोषी शिंदे, तहसिलदार डॉ.आसावरी संसारे, रेवण लेंभे, उमेश पाटील, राहुल सारंग, राहुल सूर्यवंशी, डॉ.संदीप थोरात आणि प्रशासनातील इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री शिनगारे म्हणाले की, हा गुणग्राहकतेचा, गुणगौरवाचा सोहळा आहे. महसूल विभाग कोणत्याही परिस्थितीत सदैव कार्यरत असणारा विभाग आहे. जनमानसिकतेबरोबरीने आता प्रशासनही बदलत आहे. शासन विविध लोकोपयोगी योजना गतिमानतेने राबवित आहे आणि लोकसेवक प्रशासन म्हणून आपण सर्व दुवा म्हणून काम करीत आहोत. लोककल्याणाची कामे गतिमानतेने राबविणे, ही काळाची गरज आहे. त्याप्रमाणे आपण विविध योजना लोककल्याणाची कामे गतिमानतेने राबवितही आहोत. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शासकीय योजनेचा लाभ पोहोचविण्यासाठी आपण सारे कटिबद्ध आहोत. मला अभिमान वाटतो की, ठाणे जिल्हा प्रशासन लोकोपयोगी कामे करण्यात सदैव अग्रेसर राहिला आहे. येथील अधिकारी-कर्मचारी सर्वसामान्यांसाठी संवेदनशीलतेने जबाबदारीने काम करताना दिसून येतात. कोणत्याही आपत्तीत महसूल विभाग तत्परतेने पुढे येऊन काम करतो आणि त्याला जिल्हा परिषद व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांचीही मोलाची साथ मिळते. यामुळे सर्वसामान्यांचे जीवन सुकर करण्यास आपणास यश मिळते.