आपल्या देशात यात्रेला खूप महत्त्व आहे. मग ती धार्मिक यात्रा असो की राजकीय यात्रा असो. माणसाचा एक स्वभाव आहे कोणतीही गोष्ट मिळवायची असेल तर त्यासाठी तो यात्रा करत असतो. सध्या ऑक्टोंबर, नोव्हेंबर मध्ये होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्यालाच भरघोस यश प्राप्त व्हावं यासाठी विविध पक्षाने यात्रा सुरू केल्या आहेत. अजित पवारांची जनसन्मान यात्रा, शरद पवार, जयंत पाटील यांची शिवस्वराज्य यात्रा, राज ठाकरेंची नवनिर्माण यात्रा, प्रकाश आंबेडकरांची आरक्षण बचाव यात्रा, काँग्रेसची मुंबई न्याय यात्रा, जरांगे पाटीलांची मराठा शांतता यात्रा … अशा यात्रांचे पेवच महाराष्ट्रात फुटले आहे.
नुकतेच महाविकास आघाडी मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात प्रचाराचा नारळ फोडला असून २० ऑगस्टला राजीव गांधींच्या जयंतीनिमित्त काँग्रेसच्या सभेने महाविकास आघाडीच्या प्रचाराची सुरुवात होत असताना महायुती त्याच दिवशी कोल्हापूरमध्ये महालक्ष्मीचे दर्शन घेऊन महासंवाद यात्रेला सुरुवात केली. एकंदर लोकसभेपेक्षा विधानसभेचा प्रचार खूपच लवकर सुरू होतो आहे. याचे कारण, राज्यात दोन शिवसेना, दोन राष्ट्रवादी व काँग्रेस आणि भाजप हे सहा पक्ष युती आणि आघाडीद्वारे एकमेकांना भिडणार आहेत. या पक्षांसमोर मित्रपक्षांना सोडायच्या जागांमुळे स्वपक्षात होणारी नाराजी दूर करण्याचे मोठे आव्हान असणार आहे. प्रचाराचा धडाका जोरात असल्याचं दाखवून स्वपक्षातील इच्छुकांच्या बंडखोरीलाही लगाम घालण्यासाठी प्रचार केला जात आहे. खरंतर लोकसभेपेक्षा विधानसभेची गणितं अधिक क्लिष्ट असल्यामुळे जागावाटप होण्यापूर्वीच राज्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये प्रत्येकजण यात्रांच्या निमित्ताने आपापली ताकदही आजमावून पाहात आहे.
राज्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना च्या माध्यमातून सत्ताधारी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत आहेत, तर दुसरीकडे लोकसभेत महाविकास आघाडीला मिळालेल्या यशामुळे त्यांचे मनोबल खूपच उंचावले आहे. मात्र, लोकसभेची निवडणूक ही राष्ट्रीय प्रश्न आणि त्या भोवती तयार झालेल्या प्रचाराच्या हवेवर लढली जाते. विधानसभेत मात्र पक्षाची प्रचार यंत्रणा जितकी महत्त्वाची, तितकेच उमेदवाराचे मतदारसंघातील वजन व त्याची लोकमान्यता यालाही खूप महत्त्व असते. त्यामुळे लोकसभेला नवख्या उमेदवारांना उभे करून निवडून आणणे महाविकास आघाडीला जितके सहज शक्य झाले; तितकी सोपी विधानसभेची निवडणूक असेलच, याची खात्री नाही. एकतर शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी व उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना यांचे बहुतांश आमदार अजित पवार व एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पक्षात गेल्याने शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्या पक्षांकडे सक्षम उमेदवार देण्याची चांगलीच कसोटी लागणार आहे. काँग्रेसला साठी सुद्धा एक आव्हानच असणार आहे. महायुतीत मात्र भाजपसमोर जागावाटपाचा मोठा पेच आहे. अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांच्यात मोठी रस्सीखेच होणार, यात शंका नाही. त्यातच महाराष्ट्र जातीय तेढ निर्माण होत आहे. एकीकडे मराठा समाज ओबीसीतून आरक्षण मिळवण्यासाठी आग्रही असून ओबीसी समाज आपलं असलेलं आरक्षण वाचवण्यासाठी रस्त्यांवर उतरत आहे. याचा परिणाम लोकसभेप्रमाणे महायुतीला बसून नये यासाठी लोकसभेपूर्वी घेतलेले निर्णय कसे चुकीचे होते याची कबुलीच सत्ताधारी आपल्या भाषणात देत आहे. त्याचबरोबर नवनवीन योजना आणून मतदारांना आकर्षित करण्याचा शेवटचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, या निवडणुकीत जातीचा वापर केला जाणार हे दिसत असल्याने दुसऱ्या बाजूकडून धर्माचा वापर करण्याचीही जय्यत तयारी सुरू आहे. दरम्यान लोकप्रिय योजनांचा पाऊस पाडला जात असताना विरोधक तुटून पडले आहे. एकदरीत सर्व काही सत्तेसाठी सूरू आहे याची जाणीव मतदारांना नक्कीच आहे.