ठाणे (प्रतिनिधी): प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण टप्पा-२ अंतर्गत सन २०२४-२५ मधील मंजूर लाभार्थ्यांना मंजूरी पत्रांचे वितरण जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालय, नियोजन भवन, ठाणे येथे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा-२ अंतर्गत सन २०२४-२५ मधील जिल्ह्यातील १४ मंजूर लाभार्थ्यांना प्रतिनिधिक स्वरूपात घरकुल मंजूर पत्रक वितरण वितरण करण्यात आले तसेच प्रधानमंत्री आवास योजना टप्पा एक अंतर्गत पूर्ण झालेल्या घरकुल दोन लाभार्थ्यांना गृहप्रवेशाची चावी व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. प्रधानमंत्री आवास योजना शहरी अंतर्गत तीन लाभार्थी यांना जिल्हाधिकारी यांच्या हस्ते गृहप्रवेशाची चावी देण्यात आली.
प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण टप्पा-१ अंतर्गत सन २०२३-२४ व २०२४-२५ मध्ये आतापर्यंत पूर्ण झालेल्या दोन घरकुलांचे गृहप्रवेश करण्यात आले असून प्रशस्तीपत्र देऊन लाभार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी यांनी घरकुल बांधकाम करताना येणाऱ्या अडचणींवर चर्चा केली. ग्रामीण भागातील ग्रामस्थांचे घरकुल वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असणे आवश्यक आहे असे प्रतिपादन मार्गदर्शन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी केले.
ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा-२ प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत २४-२५ करिता ७ हजार १४१ उद्दिष्ट प्राप्त झाले आहे त्यापैकी सद्यस्थितीला ३ हजार ५५६ लाभार्थींना मंजुरी देण्यात आली असून २ हजार ६०१ पहिला हप्ता वितरण करण्यासाठी FTO जनरेट करण्यात आलेले आहेत अशी माहिती प्रास्ताविक करताना प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा ठाणे छायादेवी शिसोदे यांनी माहिती दिली.
यावेळी आयुक्त नगरपरिषद संचालनालय, नवी मुंबई मनोज रानडे, निवासी उपजिल्हाधिकारी ठाणे संदीप माने, उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन हरीश पाटील, मुख्याधिकारी कुळगाव बदलापूर मारुती गायकवाड, अतिरिक्त मुख्य अधिकारी अंबरनाथ अभिषेक पराडकर, सर्व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभारी सहायक प्रकल्प संचालक संतोष पांडे यांनी केले.