---Advertisement---

भारतात बौद्ध धम्म रुजविण्यात अनागरिक धम्मपाल यांचे योगदान महत्त्वपूर्ण – प्रा. आनंद देवडेकर

By
On:
Follow Us

पिंपरी पुणे : बुद्धगया मुक्ती आंदोलनाचे प्रणेते अनागरिक धम्मपाल यांचा जन्म जरी श्रीलंकेत झाला असला तरी भारतात बौद्ध धम्म रुजविण्यासाठी त्यांचं महत्त्वपूर्ण योगदान आहे. त्यामुळे अनागारिक धम्मपालांच्या या योगदानाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या ऐतिहासिक धम्मचक्र प्रवर्तनाशी असलेला अन्वय आपण समजून घ्यायला हवा, असे प्रतिपादन अपरान्त साहित्य कला प्रबोधिनीचे केंद्रीय कार्याध्यक्ष सद्धम्मकार प्रा. आनंद देवडेकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, भीम सृष्टी, पिंपरी (पुणे )येथे बोलताना केले.

संघमित्रा महिला लेणी संवर्धक समूह, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने संस्थेच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त आयोजित धम्मलिपी गौरव दिन व अनागरिक धम्मपाल जयंती सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. देवडेकर बोलत होते. अध्यक्षस्थानी आयुष्यमती अर्चनाताई लगड या होत्या.

प्रा. आनंद देवडेकर आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, बुद्धगया मुक्ती आंदोलनाच्या सुरुवातीच्या काळात अनागरिक धम्मपालांनी बुद्धगयेत ब्रह्मदेशातील उ चंदिमा या बौद्ध भिक्षूंचे शिष्य असलेले श्रामणेर सूरिया व श्रामणेर चंद्र हे दोन तरुण भिक्षू आणले होते. त्यापैकी श्रामणेर चंद्र म्हणजेच बुद्ध निर्वाणस्थळ कुशिनाराला आपले कार्यक्षेत्र बनवून आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त करून देणारे पूज्य भन्ते महास्थवीर चंद्रमणी हे होत. नागपूरच्या ऐतिहासिक धम्मदीक्षा सोहळ्यात याच भन्ते चंद्रमणीनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली होती. आता बाबासाहेबांच्या प्रेरणेनं बौद्ध झालेल्या समाजानं इतर कोणाच्याही बहकाव्यात न येता स्वतःची ओळख बौद्ध समाज म्हणून करून द्यावी. बौद्ध वस्त्या आणि बुद्ध विहारांचे नामफलक धम्मलिपीत लिहावेत. या दृष्टीनं विचार करता ठिकठिकाणी चाललेलं बौद्ध वारसा जतन करणाऱ्या लेणी संवर्धक समूहांचं काम प्रेरणादायी आहे.

या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलताना ज्येष्ठ लेणी संवर्धक व अभ्यासक सूरज रतन जगताप म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा राजकीय वारसा चालविण्यासाठी अनेकजण पुढे येतात परंतु त्या प्रमाणात त्यांचा सांस्कृतिक वारसा चालविण्यासाठी लोक पुढे येताना दिसत नाहीत. मी मात्र डॉ. बाबासाहेबांनी दिलेला हा बौद्ध धम्माचा सांस्कृतिक वारसा चालवत आहे आणि त्याचा मला सार्थ अभिमान वाटतो.

वंदनीय भदन्त यश यांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या या दिमाखदार सोहळ्यात ‘ सेव्ह बुद्ध केव्ह ॲन्ड हेरिटेज लेणी संवर्धक पूणे ‘ यांच्या वतीनं लेणी संवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय योगदानासाठी दिला जाणारा ‘ सम्राट अशोक पुरस्कार ‘ या वर्षी ‘संघमित्रा महिला लेणी संवर्धक समूह, महाराष्ट्र राज्य’ यांना देण्यात आला. या प्रसंगी ‘सेव्ह बुद्ध केव्ह ॲन्ड हेरिटेज लेणी संवर्धक पूणे’ या संस्थेचे आयु. दीपक गायकवाड, सचिन साठे, संदीप शेंडगे, मनोज जगताप, अभिजित थोरात इ. उपस्थित होते तर संघमित्रा महिला लेणी संवर्धक समूहाच्या माया कांबळे, छाया बोरसे, पूजा वैद्य, ज्योती निकाळजे, आप्पा गायकवाड इ. उपस्थित होते. लेणी संवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचाही या कार्यक्रमात स्मृती चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

माजी आमदार गौतम चाबूकस्वार, आयु. शैलेंद्र मोरे, आयु. मिलिंदभाऊ अहिरे इत्यादींचीही या निमित्तानं भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयुष्यमती सारिका कांबळे यांनी केले तर आभार प्रदर्शन पूजा वैद्य यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघमित्रा महिला लेणी संवर्धक समूह संस्थेतील सर्वच महिलांनी विशेष मेहनत घेतली होती.

For Feedback - feedback@example.com
Join Our WhatsApp Channel

Related News

Leave a Comment