काँग्रेस चे राष्ट्रीय निरीक्षक व केरळ चे आमदार सजीव जोसेफ यांचे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन
महात्मा गांधी यांच्या सर्व धर्म समभाव च्या विचारधारेवर काँग्रेस पक्षाने जात- पात धर्म – प्रांत असा भेदभाव न करता देशातील जनतेला विकासाची दिशा दाखवली असल्यानेच त्यांचा विश्वास आजही काँग्रेस वर असल्याचे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे ठाणे लोकसभा निरीक्षक, केरळ चे आमदार सजीव जोसेफ म्हणाले. मीरा भाईंदर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी च्या वतीने अस्मिता क्लब, मीरा रोड येथे आयोजित बूथ स्तरीय कार्यकर्ता मेळाव्यात जोसेफ बोलत होते. ते पुढे म्हणाले की देशातील जनतेचा विश्वास काँग्रेस वर असून महाराष्ट्रातील जनता महायुती च्या भ्रष्ट कारभाराला कंटाळली असून लोकसभा निवडणुकीत जे घडले तेच चित्र विधानसभा निवडणुकीत दिसेल. महाविकास आघाडी च्या एकजुटीमुळे ते शक्य झाले. सत्तेच्या जोरावर शासकीय यंत्रणाचा गैरवापर करुन दोन राजकीय पक्ष फोडले, ते जनतेला आवडले नाही म्हणूनच जनतेनेच लोकसभा निवडणुकीत आम्हाला न्याय दिला. हिंदू च्या सण उत्सवात मुस्लिम सामील होत असतात तर मुस्लिमांच्या ईद, रमजान मध्ये हिंदू सहभागी होतात हेच एकात्मतेचे लक्षण असून हा भाईचारा टिकवला पाहिजे. आगामी विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्र्यांना त्यांचाच मतदार संघ राखणे कठीण जाणार असून यावेळची लढाई त्यांना वाटते तेवढी सोपी नाही असे जोसेफ म्हणाले. काँग्रेस चे निष्ठावंत, प्रामाणिक कार्यकर्तेच पक्षाची ताकद असून आपल्या अपार मेहनतीमुळे राज्यातील चित्र सुद्धा आगामी काळात बदललेले दिसेल व महा विकास आघाडी चे सरकार स्थापन होईल असा विश्वास व्यक्त केला. यावेळी प्रदेश कार्यकारी अध्यक्ष मुझफ्फर हुसैन यांनीही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत, प्रदेश प्रतिनिधी राकेश राज पुरोहित, प्रकाश नागणे, प्रदेश सचिव सुरेश दळवी, माजी नगरसेवक जुबेर इनामदार, अनिल सावंत, मर्लीन डिसा आदींनी आपले विचार व्यक्त केले. केंद्रीय निरीक्षक सजीव जोसेफ यांनी ब्लॉक, प्रभाग वाईज बूथ कमिटी चा आढावा ब्लॉक अध्यक्ष यांच्या कडून घेतला. सर्व सेल, फ्रंटल, ब्लॉक, बी. एल. ए. महिला, युवक मोठया संख्येने उपस्थित होते.