महाड : अजून तीन वर्षांनी २०२७ मध्ये होणाऱ्या महाड समता संगराच्या शताब्दी निमित्त पाणी व जात यांचा सहसंबंध नव्यानं अभ्यासायला हवा. असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय ख्यातीचे छायाचित्रकार पद्मश्री सुधारक ओलवे यांनी महाड येथे बोलताना केले. अपरान्त साहित्य कला प्रबोधिनीच्या वतीने क्रांतीभूमी महाड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकातील बहुउद्देशीय सभागृहात आयोजित कोकणातील मानवंत साहित्यिक कलावंतांच्या सत्कार सोहळ्याचे मुख्य अतिथी म्हणून पद्मश्री ओलवे बोलत होते. अध्यक्षस्थानी अपरान्त साहित्य कला प्रबोधिनीचे केंद्रीय कार्याध्यक्ष प्रा. आनंद देवडेकर होते.
पद्मश्री सुधारक ओलवे आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, आज झालेल्या सत्काराने साहित्यिक कलावंतानी अल्पसंतुष्ट न राहता आपण उत्तरोत्तर साहित्य आणि कला क्षेत्रातील उंची गाठायला हवी. तुमच्या साहित्य कलेची राष्ट्रीय स्तरावरील साहित्य व कला विषयक संस्थानी दखल घ्यायला हवी, यासाठी मी शुभेच्छा देतो.
कार्यक्रमाचे अध्यक्ष सद्धम्मकार प्रा. आनंद देवडेकर आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की गुलामांना गुलामीची जाणीव करून दिल्यानंतर व्यवस्थेविरोधात बंड करून उठल्यानेच आज समाजात सर्व स्तरावर परिवर्तन घडून आलं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतीकारक विचारानं आणि त्यांनी दिलेल्या बुद्ध धम्माच्या मार्गानं हे परिवर्तन आलंय ही वास्तविकता लक्षात घेऊन आपण साहित्यिक विचारवंतांनी नेहमीच कृतज्ञता बाळगायला हवी. डॉ. बाबासाहेबांनी दिलेला विचार पुढे घेऊन जाताना इतर दुसऱ्या कोणत्या विचारांची गुलामगिरी वा उसनवारी करण्याची आपल्याला गरज नाही. अपरान्तचं संगठन हे फक्त कोकणापुरतं मर्यादित न राहता बुद्ध आंबेडकरी विचारांचं आदर्श साहित्य संगठन म्हणून आपल्याला अपरान्तचा विस्तार करायचा आहे. यापुढे त्यादृष्टीनं आपल्याला पुढील कार्यक्रमांचं नियोजन करावं लागणार आहे असंही ते आपल्या भाषणात म्हणाले.
या कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक ज. वि. पवार, डॉ. श्रीधर पवार, कवयित्री स्नेहा विठ्ठल कदम, प्रा. सिद्धार्थ गोपाळ तांबे, रानकवी मारुती सकपाळ, छायाचित्रकार चंद्रकांत घाटगे, इंजि. अनिल जाधव, अभिनेते निलेश पवार, अशोक चाफे, सुदत्ता गोठेकर, दीपक पाटील, लेणी संवर्धक प्रफुल्ल पुरळकर इत्यादी साहित्यिक कलावंतांचा त्यांना मिळालेल्या आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कारांनिमित्त पद्मश्री सुधारक ओलवे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. अपरान्तचे रायगड जिल्हा अध्यक्ष डॉ. संजय हिराजी खैरे यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर केंद्रीय सरचिटणीस सुनील हेतकर व शाहीर गंगाधर साळवी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कोषाध्यक्ष शाहीर दीपक पवार व मारुती सकपाळ यांच्या प्रबोधनपर गीतांनी सुरू झालेल्या या अतिशय दर्जेदार कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन केंद्रीय कार्यकारिणीचे सरचिटणीस पत्रकार संदेश पवार यांनी केले.
रायगड जिल्हा अध्यक्ष डॉ. संजय खैरे,सल्लागार रमाकांत जाधव,रानकवी मारुती सकपाळ आणि रायगड जिल्हा शाखेतील सर्व पदाधिकारी यांच्या अपार मेहनतीनं कमालीचा यशस्वी झालेला हा सत्कार सोहळा येत्या जानेवारी २०२५ मध्ये होणाऱ्या अपरान्तच्या तिसऱ्या सम्यक साहित्य कला संगीतीसाठी उर्जा प्रदान करणारा ठरेल अशा आशयाची चर्चा उपस्थित श्रोत्यांमध्ये होती. अपरान्तचे सिंधुदुर्ग जिल्हा कार्याध्यक्ष इंजि. अनिल जाधव, रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष संजय गमरे, पालघर जिल्हा अध्यक्ष भावेश लोखंडे इत्यादी जिल्हा शाखांच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीनं अल्पावधीत झालेल्या संघटनात्मक बांधणीचं आणि साहित्यिक कलावंतांच्या ऐक्याचं दर्शन घडल्यानं श्रोते सुखावल्याची भावना व्यक्त होत होती.