ठाणे जिल्हयात खरीप हंगामास सुरूवात झालेली असून जिल्हयात खरीप हंगामाखाली 60,000 हेक्टर एवढे क्षेत्र आहे, त्यापैकी भात पिकाखालील सरासरी क्षेत्र 56,000 हेक्टर एवढे आहे. भात बियाण्यांची विक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यात पेरणीच्या कामास सुरूवात झाले असून शेतकऱ्यांनी भात बियाणे खरेदी करताना काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे यांनी केले आहे.
जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रूपाली सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली खरीप हंगामाचे नियोजन पूर्ण झाले आहे. त्याप्रमाणे बियाणांच्या गुणवत्ता नियंत्रणाचे काम बियाणे कायदा 1966, बियाणे नियम 1968 व बियाणे नियंत्रण आदेश 1983 अन्वये करण्यात येत आहे अशी माहिती जिल्हा कृषि विकास अधिकारी रामेश्वर पाचे यांनी दिली.
बियाणे खरेदी करताना ही काळजी घ्या.
-गुणवता व दर्जाची हमी देणाऱ्या अधिकृत बियाणे विक्रेत्यांकडूनच बियाणे खरेदी करावे.
-बनावट अथवा भेसळयुक्त बियाण्यांची खरेदी टाळण्यासाठी अधिकृत बियाणे विक्रेत्यांकडून पावतीसह बियाणे खरेदी करावे. पावतीवर बियाणांचा संपूर्ण तपशील उदा. पिकाचे नाव, वाण, संपूर्ण लॉट नं., बियाणे उत्पादक कंपनीचे नाव, किंमत, खरेदीदाराचे नाव व पत्ता इत्यादी बाबींचा उल्लेख असणे आवश्यक आहे. तसेच रोख किंवा उधारीची पावती घ्यावी.
-खरेदी केलेल्या बियाणांचे वेष्टन, पिशवी, टॅग, खरेदीची पावती व थोडे बियाणे कापणी होईपर्यंत जपून ठेवावे.
-खरेदी केलेले बियाणे त्या हंगामासाठीच आहे याची खात्री करावी.
-भेसळीची शंका दूर करण्यासाठी बियाणांची पाकिटे, पिशव्या सिलबंद अथवा मोहरबंद असल्याची खात्री करावी.
-बियाणे उगवणीच्या खात्रीसाठी पाकिटावरची, लेबलवरील अंतिम मुदत पाहून बियाणे खरेदी करावे.
-कमी वजनाच्या निविष्ठा तसेच छापील किंमतीपेक्षा जास्त किमंतीने विक्री होत असल्यास कृषि विभागाकडे तक्रार करावी. त्याकरिता 7039944689 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. त्यांच्या तक्रारींचे निरसन तालुकास्तरीय कृषि विभागाचे अधिकारी करतील.