छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत, महाराष्ट्राची अस्मिता आहेत, मराठी माणसाच्या मनात आणि रोमारोमांत छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा, त्यांचे विचार आणि आचार भिनलेले आहेत. अशा महापुरुषाचा पुतळा कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणला राजकोट किल्ल्यावर कोसळून पडतो या घटनेने मराठी माणसाला वेदना झाल्या आहेत. पण या घटनेला जबाबदार कोण, दोषी कोण याचा वेगाने शोध घेण्याऐवजी राज्यातील राजकीय पक्ष व त्यांचे नेते एकमेकांवर चिखलफेक करत राजकिय शीमगा सूरू केला आहे. राज्यातील विधानसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. म्हणूनच राजकीय लाभ पदरात पाडून घेण्यासाठी राजकीय पक्षात स्पर्धा सुरू झाली आहे. महायुती सरकारला कोंडीत पकडण्यासाठी, महायुती सरकारची बदनामी करण्यासाठी, शिंदे-फडणवीस नि अजितदादांना धारेवर धरण्यासाठी महाराजांचा पुतळा हा मुद्दा विरोधी पक्षांकडून तेवत ठेवला जातो आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला याला सर्वस्वी महायुतीचे सरकार जबाबदार आहे, असे गृहीत धरून महाआघाडीने एकनाथ शिंदे सरकारवर हल्लाबोल केला आहे. गेल्या वर्षी ४ डिसेंबर २०२३ रोजी नौदल दिनाच्या निमित्ताने राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण केले. संरक्षणमंत्री राजनाथ सिंग, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तत्कालीन केंद्रीयमंत्री नारायण राणे अशा दिग्गजांच्या उपस्थितीत हा शानदार सोहळा संपन्न झाला. पण आठ महिन्यांत ३५ फूट उंचीचा हा पुतळा कोसळला.
महाराष्ट्रात यापूर्वी असे कधी घडले नव्हते. त्यामूळे महाराजांचा पुतळा कोसळल्यावर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळने स्वाभाविक होते. पण जनतेने मनावर संयम राखला. कुठेही संताप व्यक्त करण्यासाठी तोडफोड झाली नाही. हिंसाचार झाला नाही. पोलिसांना कुठेही बळाचा वापर करावा लागला नाही. पण राजकीय पक्षांच्या आरोप-प्रत्यारोपांना उधाण आले. शिल्पकार म्हणून जयदीप आपटे व स्ट्रक्चरल कन्सल्टंट म्हणून चेतन पाटील यांची निवड कोणी व कशाच्या आधारावर केली? शिल्पकाराचा अनुभव काय? पस्तीस वर्षांच्या तरुणाला एवढे मोठे काम कसे दिले गेले? मालवणला महाराजांचा पुतळा उभारण्याच्या कामात हजारो कोटींचा भ्रष्टाचार झाला, असेही महायुती सरकारवर विरोधकांनी आरोप केले. विरोधी पक्षाने थेट सार्वजनिक बांधकाम खात्यावर खापर फोडले व मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या राजीनाम्याची मागणी केली. महाराजांचा पुतळा शासनाने नव्हे तर नौदलाने बसवला असे स्वत: मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यामुळे या दुर्घटनेला नेमके कोण दोषी आहेत याचे गूढ वाढले. ताशी ४५ किमी वेगाने वारे वाहत असताना हा पुतळा कोसळून पडला अशी माहिती राज्य सरकारने दिली पण त्यावर विश्वास कसा ठेवायचा? शिवरायांचा पुतळा कोसळल्यावर विरोधी पक्षांनी भाजपा व महायुती सरकारवर निशाणा साधला. हे तर मोदी-शहांचे दलाल आहेत, असे आरोप झाले. राज्यात शाळेत जाणाऱ्या मुलीही सुरक्षित नाहीत आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांचेही महायुती सरकारला संरक्षण करता येत नाही, अशी आगपाखड विरोधी पक्षांनी केली. महाराजांनी उभे केलेले गडकिल्ले साडेतीनशे वर्षे भक्कमपणे उभे आहेत. त्यांचीही देखभाल उत्तम प्रकारे सरकार करीत नाही. विशाल गडावर अतिक्रमणांचा विळखा पडल्यावर आंदोलन झाले तेव्हा सरकारला जाग आली. राजकारणी नेते ऊठ सूठ छत्रपतींचे नाव घेतात मग त्यांचे पुतळे व गड किल्ल्यांची देखभाल उत्तम का ठेऊ शकत नाहीत? मालवणच्या पुतळ्याचे खापर नौदलावर फोडले गेले, खरोखरंच आपले नौदल इतके लेचेपेचे आहे का? लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर घाईघाईने पुतळा उभारला गेला व शिल्पकाराला पुतळा लवकर देण्याची घाई करण्यात आली हे खरे का? तीन महिन्यांवर विधानसभा निवडणूक आली आहे म्हणून महायुती सरकारच्या विरोधात रान उठविण्यासाठी महाआघाडीचे नेते संधी शोधत आहेत, पण छत्रपतींच्या पुतळ्यावरून राजकारण पेटत ठेवणे हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला मानवणारे नाही. कारण कोणतेही असो पण घडलेली घटना ही महाराष्ट्राला लाजविनारीच नव्हे तर देशाची मान खाली घालायला लावणारी आहे. एकीकडे देश तंत्रज्ञानात अग्रेसर होत असल्याचं जगाला दाखवत असताना अश्या प्रकारे महपुरूषांचा पुतळा कोसळणे दुदैवी आहे. कारण हे नुसते पुतळे नसून प्रत्येक नागरिकांची अस्मिता आहे, त्यातून काहीतरी राजकिय नेत्यांनी बोध घेऊन राजकारणाच्या पलिकडे जाऊन सुज्ञ पणे वागावे हिच अपेक्षा.