आपल्या लोकशाही देशात कायद्याला महत्व अनन्यसाधारण आहे. परंतु हा समज धनदांडग्यांनी मात्र गैसमज करून घेतला आहे की काय असा प्रश्न होत असलेल्या अपघातावरून पडतो.

पुण्यातील पोर्शे कारने पहाटे दिलेली धडक काय, छत्रपती संभाजीनगरमध्ये कारचालकाने उडवून ठार केलेले तरुण दांपत्य काय, किंवा मुंबईतील वरळी भागात आलिशान गाडीने उडवून केलेली हत्या काय; या सगळ्याचा एकच अर्थ दिसतो आहे तो म्हणजे पैशाचा माज. यातून असे दिसते की, श्रीमंतांची पोरं नशेच्या आहारीगेल्यामुळे यांच्या बेधुंदत सामान्य माणसाचं आयुष्य धोक्यात आले आहे. कधी कोणती गाडी कोणाला चिरडेल याचा काही नेम नाही. याला फक्त नशेखोर जबाबदार नाही तर नशेचे धंदा करणारेही तितकेच जबाबदार आहेत एवढेच नव्हे तर या नियमबाह्य धंदा करणाऱ्या लोकांना पाठबळ देणारी सरकारी यंत्रणाही तितकीच जबाबदार आहेत. पुण्यात अल्पवयीन मुलाने पहाटे मद्यधुंद अवस्थेत अपघात केल्यानंतर राज्य सरकारला उशिरा सुचलेले शहाणपण म्हणजे पुण्यात, मुंबईत आणि इतरही काही ठिकाणी बार, पब्ज यांच्यावर कडक कारवाई सुरू झाली होती. राज्य सरकार कारवाईत असताना सत्ताधारी पक्षाच्याच एका कथित नेत्याचा मुलगा रात्रभर मौजमजा करून मद्यधुंद अवस्थेत वरळीत दोघांना धडक देऊन या गाडीने कावेरी नाखवा या महिलेला फरफटत नेले.

ही आलिशान गाडी चालविणारा मिहिर शहा हा २४ वर्षांचा तरुण बेपत्ता आहे. त्याच्या वडिलांना पोलिसांनी पकडले. त्यांना सोमवारी न्यायालयाने जामीनही दिला. इतके होऊनही पोलिसांना शरण येण्याइतकी समज किंवा अक्कल ज्या तरुणाकडे नाही; तो संपत्तीच्या माजाने किती आंधळा झाला असेल, याची कल्पना येते. पुण्यात अपघात झाल्यानंतर अल्पवयीन मुलाचे सगळे नातेवाईक, मुलगा अडकणार कसा नाही आणि पुरावे कसे दाबून टाकता येतील, याच्या प्रयत्नात होते. या घटनेनंतर पुणेकरांनी आणि अनेक संघटनांनी जो दबाव निर्माण केला, त्यामुळे जराशी कमी मनमानी करता आली. आता वरळीतील प्रकरणात या गुन्हेगार मुलाचे वडीलच सत्ताधारी शिवसेना पक्षाचे नेते असतील, तर आत्ता पडद्यामागे काय काय हालचाली आणि व्यवहार चालू असतील, याची कल्पनाही करता येत नाही. पहाटे बाजारातून मासेखरेदी करून विकण्याचा व्यवसाय करणारं सामान्य हे नाखवा दांपत्य ! त्यांच्यापेक्षा शहा कुटुंबाचे वजन कितीतरी अधिक. त्यामुळेच, ‘हे सगळे मोठे लोक आहेत. त्यांना काहीही होणार नाही…’ ही कावेरी यांचे पती प्रदीप नाखवा यांनी व्यक्त केलेली भावना अंगावर काटा आणणारी आहे.

उद्योगपतीचा तरुण मुलगा जीवघेणा अपघात करतो. मात्र, त्याच्या जागी चालकाला बसवून या मुलाला मोकळे केले जाते. तो उजळ माथ्याने वावरतो; अशी एखादी कथा किंवा मालिका तर येऊन गेलेली नाही ना? अशा कथेतून स्फूर्ती घेऊन राज्यातील धनाढ्यांना आत्मविश्वास तर आलेला नाही ना? त्यांना वठणीवर आणण्याची हिंमत, पारदर्शकता आणि कायद्याबद्दलची बांधिलकी सगळ्या व्यवस्थेत वरपासून खालपर्यंत किती शिल्लक आहे; याची आता परीक्षा आहे. निष्पाप माणसांना निदान मेल्यावर तरी न्याय मिळू दे!