शहरातील तरुण नशेच्या आहारी जाऊन समाजात अशांती वाढत असताना अनेक वर्षे झोपेचं सोंग घेणारं प्रशासन जागे झाले आणि मुंबई, ठाणे, नवी मुंबई, मिरा-भाईदर, कल्याण-डोंबिवलीत एकामागोमाग एक बेकायदा हॉटेल, बारवर कारवाई करण्यात येत आहे. गेल्या गेल्या चार-पाच वर्षांपासून ठाणे आणि परिसरातील तरुणाईला अमली पदार्थांचा कसा विळखा बसला आणि तो सोडविण्यात स्थानिक यंत्रणा कशा कुचकामी ठरल्या याच्या कहाण्या आता पुढे येत आहेत.
मुख्यमत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात पोलिसांनी गेल्या दीड वर्षात ६० कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. यामध्ये गांजा, चरस आणि एमडी या अमली पदार्थांचा सर्वाधिक समावेश आहे. पण गेल्या पाच ते सात वर्षांत हे प्रमाण उघडकीस आले त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक असल्याचे माहीतगारांचे म्हणणे आहे. गेल्या काही वर्षांत ठाण्यात रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या पब, लेडीज बार, हुक्का पार्लर यांना अक्षरश: ऊत आला आहे. परमबीर सिंह यांच्याकडे ठाण्याचे पोलीस आयुक्तपद असताना हे प्रकार वाढीस लागले. आता तर कोठारी कंपाऊंडसारख्या परिसरात या धंद्यांची लांबलचक साखळीच उभी राहिली आहे. ठाणे महापालिकेत तर रात्रभर चालणाऱ्या पब, हॉटेलांना संरक्षण देणारी एक मोठी यंत्रणाच कार्यरत आहे. त्यामुळे हे धंदे आतापर्यंत तेजीत चालत होते. ठाणे शहरात मुंबई नाशिक महामार्ग, घोडबंदर, मुंब्रा बाह्यवळण, शिळफाटा अशा महत्त्वाच्या मार्गांचे जाळे आहे.
ठाणे शहराला मिरा भाईंदर, नवी मुंबई, मुंबई ही शहरे जोडली जातात. त्यामुळे तस्करांना मुख्य मार्ग आणि महामार्गांवरून सहज वाहनाने शहरात दाखल होता येते. जिल्ह्यात अमली पदार्थ पोहोचविण्यासाठी पान टपऱ्या आणि महामार्गालगतच्या ढाब्यांचा वापर अधिक होत होता. त्याच बरोबर शहरात मोठ्याप्रमाणावर अनधिकृत बांधकामे करून बार, हुक्का पार्लर प्रशासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून सुरु केली जात होती. खरंतर सध्या अनधिकृत बार, हुक्का पार्लरवर कारवाई केली जात आहे हे सर्व धंदे एका रात्री सुरु झाले नव्हते. मग एवढे दिवस हे अवैध धंदे कोणाच्या आशीर्वादाने बहरले होते त्या जबाबदार सर्व अधिकाऱ्यांवरही कारवाई झाली पाहिजे तरच आता होत असलेली कारवाईचे सार्थक होईल, नाहितर कारवाईचा दिखावा ठरेल.