एकीकडे सार्वजनिक गणेशोत्सव आणि दुसरीकडे, जगभरात घरोघरी पूजले जाणारे लक्षावधी गणपती; असा हा महाराष्ट्रातून सुरू झालेला आणि सातासमुद्रापार भरारी घेतलेला गणेश महोत्सव आहे. तो अर्थातच गणपतीच्या निस्सीम भक्तीतून होतो आणि गणपती ही आपण बुद्धीची आणि कलांची देवता मानतो. बुद्धी आणि संवेदना, प्रज्ञा आणि प्रतिभा, कला आणि कौशल्य हे सारेच गणरायाच्या ठायी आहे. ते सारे आपल्याकडे म्हणजे भक्तांकडे यावे, यासाठी केलेला महोत्सव अर्थात आराधना होय. खरंतर स्वातंत्र्य काळापूर्वी लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेश उत्सव सुरू केला त्या मागची भूमिका हिती ती म्हणजे समाजामध्ये स्वातंत्र्याची चळवळ उभी करणे, लोकांमध्ये देश प्रेमाची जनजागृती करणे अश्या निःसीम, निर्मळ हेतुने. राज्यात आज लाखभर छोटी मोठी सार्वजनिक गणपती मंडळे असावीत. याशिवाय, गेले दशकभर जगभर घरगुती गणपती बसविण्याचे प्रमाण झपाट्याने वाढत आहेत. ज्यांच्या घरात पूर्वी कधीही गणेशोत्सव होत नव्हता; अशी लाखो कुटुंबे आज निदान दीड दिवसाचा तरी गणपती आणतात.
देशभरात आणि विशेषकरून महाराष्ट्रात गणेशोत्सवाने सणाउत्सवांच्या मोठ्या आर्थिक उलाढालीला आरंभ होतो. ती वर्ष संपेपर्यंत विविध निमित्तांनी चालू राहील. अर्थकारणाला मिळणारी ही गती कोट्यवधी मनुष्यतासांचा हंगामी, तात्पुरता रोजगार निर्माण करते. अनेकांकडे रोजगार न करताही पैसा जातो. एकीकडे हे आश्वासक, अर्थचक्राला गती देणारे चित्र व दुसरीकडे सार्वजनिक गणेशोत्सवातल्या ध्वनिप्रदूषण, प्रकाशप्रदूषण, फटाक्यांनी होणारे वायुप्रदूषण तसेच एकूण सांस्कृतिक प्रदूषण यांनी आपली हद्द ओलांडली आहे. आज या उत्सवात जोमाने शिरलेला हा सगळा अनाचार आणि दुर्व्यवहार हे विघ्न दूर करणे हेच सगळ्यांत मोठे धर्मकार्य मानले पाहिजे. उत्सवात कोणतेही नियम न पाळणाऱ्या, संवेदना हरपून बसलेल्या आणि एक प्रकारच्या नशेत वाहावत जाणाऱ्या तरुणाईचे व कर्कश्श समूहांचे लांगूलचालन केले की आपण मोठे शौर्य गाजविले, अशा भ्रमात स्वत:ला लोकनेते म्हणविणारे वावरत असतात. मात्र, वाट्टेल तितका वेळ नाचा, वाट्टेल तितक्या उंच दहीहंड्या बांधा, वाट्टेत तितका वेळ दांडिया खेळा आणि वाट्टेल तेवढे मोठे मांडव घाला, वाट्टेल तितके ध्वनिवर्धक लावा.. असे सांगणारे व त्यासाठी भांडणारे नेते हे खरे तर समाजाचे शत्रू आहेत. लोकमान्य टिळक यांच्यात जशी इंग्रजांच्या जुलमाला न जुमानता गणेशोत्सव किंवा शिवजयंती उत्सव हा लोकोत्सव करण्याची हिंमत होती; पण आज असे कोण आहे का? ‘आमच्या मंडळाचा उत्सव पूर्णपणे शांत, दंगामस्ती न होणारा, ध्वनिवर्धक नसणारा व डोळेफोडू प्रकाश न फेकणारा, नेटके सांस्कृतिक कार्यक्रम आखणारा असेल..’ असे म्हणणारे व तसे वागणारे आज किती आहेत?
गावोगावी होणारे भयानक ध्वनिप्रदूषण, प्लास्टिकचा प्रचंड उत्सवी कचरा आणि परिणामी निसर्गाचा होणारा ऱ्हास, नव्याने बस्तान बसविलेले लेझरझोत, उत्सवात असंख्य महिलांचा होणारा विनयभंग, व्यसनांचा विक्रम हा सगळा गौरव नसून ते उत्सवाला लांच्छन आहे, हे समजत नसेल तर ते कठोरपणे सांगण्याची जबाबदारी सरकार, प्रशासन, मिडिया, सामाजिक संस्था आणि कार्यकर्त्यांची आहे. डीजे आणि लेझर यांनी तर उच्छाद मांडला आहे. प्रचंड आवाजाने वाढणारा रक्तदाब, हृदयात भरणारी धडकी आणि वाढणारे ठोके हे दुष्परिणाम समजायला डॉक्टरांचीही गरज नसते. सध्याचे सज्जनशक्ती मूक आणि स्वैराचारी मोकाट, हे चित्र बदलायचे असेल तर सगळ्यांना एकत्र येऊन हे लोकोत्सव विवेक बुद्धीने साजरे करायला हवे. आपण गणपती ही बुद्धीची देवता मानतो आणि त्याची सार्वजनिक आराधना मात्र निर्बुद्धपणे करतो या उत्सवातील विसंगतीचे विघ्न दूर होवो हीच विघ्नहर्ता चरणी प्रार्थना.