गेले अनेक वर्ष आपण दिवाळीच्या पूर्वी एक हमकास जाहिरात बघत असतो. उठा उठा दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली. त्यामुळे आपल्याला दिवाळीची चाहूल लागते. त्याचप्रमाणे राजकीय नेत्यांकडून अनेक विकास कामांचे उद्घाटन होतात तेव्हा निवडणुका जवळ आली याची चाहूल लागते. आता उद्घाटनाची घाई, निडणुका आल्या बाई अशी परिस्थिती पाहता दिसुन येत आहे. कामांचं श्रेय घेण्याची जणू स्पर्धाच लागले आहे. मग ती कामे पूर्ण झालेली असोत की अपूर्ण कामे असोत उद्घाटन करून कामाचे श्रेय लाटण्यात सर्वच नेते मंडळी जीवाचं रांग करत आहेत. एकमेकांवर राजकीय चिखल फेक करत आहेत. मागील पाच वर्ष आपली तिजोरी भरण्यात व्यस्त असणारे नेते आपली पाच वर्ष संपल्यानंतर थातूरमातूर कामांची उद्घाटन करून मतदारांना आकर्षित करण्यात व्यस्त झाले आहेत. पाच वर्षांनी एकदा मतदारांना हा अनुभव येतोच. खरंतर आजचा मतदार राजा अतिशय सुज्ञ आहे. त्याला सर्व काही कळतं. पाच वर्षाच्या अखेरीस पुन्हा पाच वर्षांपूर्वी दिलेल्या आश्वासनांची आठवण होते आणि तीच आश्वासने नव्याने आपल्या वचन पत्रामध्ये देऊन मोकळे होतात. कधी कधी कोणी त्याला वचनपूर्ती म्हणतात तर कधी कधी कोणी त्याला गॅरंटी पत्र असे म्हणतात. वचनपूर्ती आणि गॅरंटीचं पर्व सूरू होत यात फरक मात्र काहीच नाही. वचनपूर्ती असो की गॅरंटी असो नेते मंडळी मात्र आपलं भविष्य कसं सुरक्षित होईल याची मात्र परिपूर्ण गॅरेंटी घेण्याचा काटेकोर प्रयत्न करत असतात.
आपल्या राज्यात आज देखील खेड्यापाड्यात रस्ता नाही. रस्त्या अभावी अनेकांचे जीव जात आहेत. रस्त्या अभावी लहान चिमुकले शिक्षणापासून वंचित राहत आहे. राज्यामध्ये बुलेट ट्रेन आणून विकासाच्या बाता केल्या जातात. सामान्य नागरिकांना आज आरोग्य सेवा मिळत नाही. अशा राज्यात मोफत उपचाराच्या बाता केला जातात. शिक्षण एवढे महागले आहे की उच्च शिक्षण घेणे तर दूर प्राथमिक शिक्षण मिळणं अवघड झाले आहे. अशा राज्यात मोफत शिक्षणाच्या बाता केल्या जातात. आज बेरोजगार तरुण आत्महत्येच्या वाटेवर आहे. अशा राज्यात रोजगाराच्या बाता केल्या जातात. निवडणुकीच्या तोंडावर काही योजना आणायच्या आणि मतदारांना आकर्षित करायचं एवढंच पाच वर्षाच्या शेवटी काम असतं. सत्ता कोणाचीही असो नेत्यांच्या स्वार्थीपणामुळे भोगाव लागते ते मतदारांना अर्थात नागरिकांना.
अशा परिस्थितीत आता वेळ आली आहे ती म्हणजे मतदारांनी वचनपूर्ती आणि गॅरंटीचं स्वतःशी स्वतःला देणं. मी असा नेता निवडेन की जो निस्वार्थपणे आपली लोकसेवक म्हणून प्रमाणिकपणे जबाबदारी पार पाडेल. जो लोकसेवक आपल्या मातृभूमीशी प्रामाणिक राहून कृतज्ञता बाळगेल. जो लोकसेवक स्वतःपेक्षा राष्ट्रप्रेमाला प्राधान्य देईल असा लोकप्रतिनिधी मी निवडून देईन ही प्रतिज्ञा आपण करुन करुन आपलं राष्ट्रिय कर्तव्य बजावत आपण येणाऱ्या निवडणुकीला सामोरं जायला हवं. तरच आपण वचनपूर्ती आणि गॅरंटीचं पर्व खोटं पर्व संपवू शकतो आणि एक नवीन पर्वाची सुरुवात करू शकतो. हीच आधुनिक महाराष्ट्राच्या विकासाची वाट आहे. ती चालताना आता कोणताही विलंब नको.