ठाणे : रस्त्यावरील बालकांना समाजाच्या मुख्यप्रवाहात आणण्यासाठी महिला व बाल विकास विभागाने नाविन्यपूर्ण योजनेतंर्गत फिरतेपथक (मोबाईल स्कूल) ही संकल्पना राबविली होती. या प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात नवी मुंबई व अंबरनाथ नगरपरिषदेच्या कार्यक्षेत्रातील 450-500 बालकांना यंदाच्या सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात महापालिकेच्या शाळेमध्ये प्रवेश देण्याचा कार्यक्रम येत्या शुक्रवार, दि. 21 जून 2024 रोजी होणार आहे, अशी माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी महेंद्र गायकवाड यांनी दिली आहे.
रस्त्यावरील बालकांसाठी महिला व बाल विकास विभागाने नाविन्यपूर्ण योजनेतंर्गत सन 2022-2023 या शैक्षणिक वर्षात फिरतेपथक (मोबाईल स्कूल) ही संकल्पना ठाणे जिल्ह्यासह राज्यातील 7 जिल्ह्यांमध्ये पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविण्यात येत आहे. ठाणे जिल्ह्यामध्ये 1 फेब्रुवारी 2023 ते ऑगस्ट 2023 पर्यंत हा कार्यक्रम अतिशय यशस्वीरित्या राबविण्यात आला आहे. साधारणतः 170 रस्त्यावरील बालकांना सन 2023-2024 या शैक्षणिक वर्षामध्ये ठाणे व भिवंडी महानगरपालिकेच्या शाळांमध्ये प्रवेश मिळवून देण्यात आले होते.
या प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात नवी मुंबई महानगरपालिका व अंबरनाथ नगरपरिषद यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या रस्त्यावरील बालकांबरोबर महिला व बालविकास विभागाच्या ठाणे कार्यालयाने गेले 6 ते 7 महिने काम करुन बालकांमध्ये व त्यांच्या पालकांमध्ये शिक्षणाची गोडी वाढविली आहे. सदर बालकांना शाळेमध्ये प्रवेश द्यावा व त्यांचे शिक्षण व्यवस्थित व्हावे, यासाठी बालकांचे समुपदेशन करण्यात आले आहे. या सर्वांना परिपाक म्हणून साधारणतः यावर्षी सन 2024 – 2025 च्या शैक्षणिक वर्षामध्ये रस्त्यावर राहणारी व शाळेत न जाणारी 450 ते 500 बालके विविध महानगरपालिकेच्या शाळांमध्ये दाखल करण्यात येणार आहेत.
या बालकांच्या शाळेचे प्रवेशपत्र महिला व बालविकास विभागाचे सचिव अनुप कुमार यादव (भा.प्र.से.) यांच्या शुभहस्ते वितरीत करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास महिला व बालविकास आयुक्त उपस्थित राहणार असून जिल्हाधिकारी अशोक शिनगारे हे या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी असणार आहेत. तसेच सन 2023-24 या वर्षात 10 वी, 12 वी उत्तीर्ण झालेल्या बालगृहातील 50 मुलांचा सत्कार सोहळा यावेळी आयोजित करण्यात आला आहे, असे ठाणे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी महेंद्र गायकवाड यांनी कळविले आहे.