भिवंडी: शाळेचा पहिला दिवस म्हणजे सर्व विद्यार्थ्यांचा आनंदाचा दिवस असतो. सुट्टीनंतर विद्यार्थीं, शिक्षक शाळा सुरू होण्याची वाट पाहत असतात. राहनाळ शाळेने सातत्याने विविध उपक्रमाच्या माध्यमातून शाळेचे नाव महाराष्ट्रभर केल्याचा सार्थ अभिमान राहनाळ ग्रामस्थांना आहे.
मुलांनी आपल्या आवडीचे क्षेत्र निवडून नाव कमवावे, असे उद्गार उपसरपंच प्रताप पाटील यांनी प्रवेशोत्सव कार्यक्रमात काढले.
१५ जून पासून शैक्षणिक सत्र सुरू झाले असून राहनाळ शाळेत या सत्राची अत्यंत उत्साहाने सुरुवात करण्यात आली. पहिलीत दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांची रसिका पाटील व संध्या जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ढोल ताशा लेझीमच्या गजरामध्ये गावातून मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक शाळेजवळ येताच मुलांवर पुष्पवृष्टी करण्यात आली.
सावित्रीमाईंच्या प्रतिमेला प्रताप पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके, बूट व पायमोजे यांचे वाटप करण्यात आले. इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना पेन, चॉकलेट व पुस्तक, बूट देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी प्रताप पाटील यांनी आपल्या जडणघडणीत शिक्षकांचे मोलाचे स्थान असून मी त्यांच्याशी कृतज्ञ असल्याचे सांगितले.
शाळेचे मुख्याध्यापक अजय पाटील यांनी शासनाच्या विविध योजना, त्याचबरोबर प्रवेशोत्सवा मागील शासनाची भूमिका समजावून सांगितली.
यावेळी पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रमिला कडू, उपाध्यक्ष मनाली जाधव, सदस्य विलास रामिष्टे उपस्थित होते. इयत्ता सातवीमध्ये शिकणारा दिव्यांग विद्यार्थी समद मस्कर यालाही पाठ्यपुस्तके देऊन स्वागत करण्यात आले. सूत्रसंचलन चित्रा पाटील तर आभार प्रदर्शन अंकुश ठाकरे यांनी केले.