भाईंदर : मिरा भाईंदर महानगरपालिका, आय.डि.बी.आय. बँक व CEGP फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मिरा भाईंदर महानगरपालिका शाळांमध्ये नवीन तीन डिजिटल बोर्डचे अनावरण आयुक्त तथा प्रशासक संजय श्रीपतराव काटकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. सदर प्रसंगी उपायुक्त प्रसाद शिंगटे, शहर अभियंता दिपक खांबित, मुख्यलेखाधिकारी व वित्त अधिकारी कालिदास जाधव, जनसंपर्क अधिकारी तथा सिस्टीम मॅनेजर राज घरत, सहाय्यक आयुक्त शिक्षण दिपाली जोशी, आय.डि.बी.आय. बँकचे मुख्य महाव्यवस्थापक शशांक दिक्षित, वरिष्ठ प्रादेशिक प्रमुख देवजानी मंडल, शाखा व्यवस्थापक संजय वलेच्चा, नाविन्यता कक्ष प्रकल्प प्रमुख व महापालिका शाळा मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते.
मिरा भाईंदर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा आणखी उंचावण्यासाठी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक यांच्या व सबंधित अधिकाऱ्यांच्या प्रयत्नाने महानगरपालिकेतील शाळांमध्ये 128 वर्ग हे डिजिटल स्वरूपात सुरू करण्यात आले आहे. यामध्ये आणखी भर म्हणून महापालिका, आय.डि.बी.आय. बँक व CEGP फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नवीन तीन डिजिटल बोर्ड वर्गाचे अनावरण करण्यात आले. CSR काँक्लेव्ह 2024 मध्ये शिक्षणावर महत्त्वपूर्ण संवाद साधत शाळा व विद्यार्थ्यांसाठी नामांकित कंपनीच्या तसेच सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून सी.एस.आर. निधी प्राप्त करून घेऊन विविध सोयीसुविधा पुरवण्यात येणार आहे.
वर्गातील डिजिटल बोर्ड, विविध संकल्पनेतून साकारण्यात आलेली भित्तीचित्रे, नवीन अभ्यासक्रमाची पुस्तके, संगणक कक्ष या सर्वांच्या माध्यमातून शाळेची व शालेय विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्याचा ध्यास मिरा भाईंदर महानगरपालिकेने घेतला आहे. त्याचबरोबर COE (Center Of Excellence) स्थापन करून त्या अंतर्गत सर्व NGO च्या माध्यमातून नवनवीन उपक्रम राबवले जात आहेत. याद्वारे शैक्षणिक गुणवत्ता वाढवून मुलांमधील कौशल्यांचा विकास साधला जाणार आहे. या डिजिटल वर्गांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नवनवीन माहिती चित्रफित किंवा फोटोच्या स्वरूपात शिकवण्यात येणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांसाठी नवनवीन अभ्यासक्रम देखील उपलब्ध करून देण्यात आले आहे. सदर डिजिटल वर्ग हे मराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दू, गुजराती व सेमी इंग्रजी या भाषेत सुरू करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम किंवा एखाद्या विषयाबाबत पडणारे प्रश्न या डिजिटल स्वरूपाच्या माध्यमातून सहज सोडवता येणार आहेत. या डिजिटल वर्गांमुळे मिरा भाईंदर महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर होणार आहे.