ठाणे – पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीचा सामना कसा करावा, पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास बचाव कसा करावा आदींबाबतचे प्रशिक्षण आज राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या जवानांनी ठाणे आपत्ती प्रतिसाद दल, आपत्ती व्यवस्थापन विभागातील कर्मचारी, आरोग्य कर्मचारी यांना दिले.
जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण ठाणे यांचे वतीने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसादर दल यांचे मार्गदर्शनाखाली समुदाय आधारित आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम आज ठाणे महापालिकेतील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात आयोजित केला होता.
अतिवृष्टीच्या काळात डोंगराळ भागात दरड कोसळण्याच्या शक्यता येते या पार्श्वभूमीवर पावसाळा कालावधीत डोंगराळ भागात राहणाऱ्या नागरिकांनी इतरत्र स्थलांतरीत होण्याच्या दृष्टीने तयारी ठेवावी. त्याचप्रमाणे पूरपरिस्थितीचा धोका असलेल्या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांनी आपली महत्वाची कागदपत्रे, किंमती वस्तू आदींची काळजी घेवून त्या सुरक्षित राहतील त्या ठिकाणी ठेवण्याची तजवीज करावी. तसेच पुराचा धोका निर्माण होणार असल्याची परिस्थिती असल्यास जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या मार्गदर्शनानुसार सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत व्हावे. त्याचप्रमाणे सुरक्षिततेचा उपाय म्हणून घरातील प्लॅस्टिकच्या पाण्याच्या बाटल्या एकत्रित दोरीने बांधून त्या कमरेला गुंडाळून घ्याव्यात जेणेकरुन पुराच्या पाण्यात बुडण्याचा धोका नसतो. तसेच घरातील पाणी भरण्याच्या प्लॅस्टिकच्या कळशा, शहाळ्याचे सहा-सात नारळ एकत्रित दोरीने बांधून याचा देखील वापर बुडण्यापासून बचाव करण्यासाठी होवू शकतो हे या प्रशिक्षण कार्यक्रमात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या जवानांनी प्रात्याक्षिकासह करुन दाखविले.
अतिवृष्टी दरम्यान ग्रामीण भागात तसेच चाळ किंवा झोपडपट्टी परिसरात वीजप्रवाह बंद केला जातो, अशा वेळेस बॅटरी किंवा कंदील जवळ ठेवा, वाहत्या पाण्यात चालताना काठीचा वापर करा, पुराच्या पाण्यात काचेचे तुकडे, तीक्ष्ण वस्तू वाहून येत असल्याने पुराच्या पाण्याशी शक्यतो संपर्क टाळावा, वेगाने वाहणाऱ्या पाण्यात पोहण्याचा प्रयत्न करु नये आदी महत्वाच्या बाबींची माहिती या प्रशिक्षण कार्यक्रमात देण्यात आली. पूरपरिस्थतीदरम्यान स्थानिक जिल्हाप्रशासनाकडून देण्यात येणारे सूचनांचे पालन करावे. तसेच आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय सेवा सुविधा कशा पध्दतीने द्याव्यात याचीही माहिती आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना देण्यात आली.
सदर प्रशिक्षणासाठी मा. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, मा.आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, महसुल विभागाचे अधिकारी, तलाठी, ठाणे महानगरपालिकेचे वैद्यकीय विभागाच्या आशा वर्कर्स, सिस्टर्स, विविध कॉलेजेसचे एनसीसी / एनएसएसचे विद्यार्थी उपस्थित होते.