प्रतिकूल परिस्थितीवर मात करून अधिकारी झालेल्या विविध व्यक्तींच्या यशकथा असलेले “आम्ही अधिकारी झालो !” हे देवेंद्र भुजबळ लिखित आणि न्युज स्टोरी टुडे पब्लिकेशन तर्फे प्रकाशित झालेल्या ,राज्यपाल श्री रमेश बैस यांनी गौरविलेल्या पुस्तकातील नायक नायिकांच्या कर्तृत्वावर
सौ अलका भुजबळ यांनी टाकलेला हा एक दृष्टिक्षेप.
अमीट नीला सत्यनारायण – भारतीय प्रशासकीय सेवेबरोबरच कला, साहित्य, संस्कृती, गीत, संगीत अशा विविध प्रांतामध्ये स्वतःचा अमीट असा ठसा उमटविणाऱ्या मॅडम.
तिकीट कलेक्टर ते डिस्ट्रिक्ट कॉलेक्टर – तिकीट कलेक्टर असताना,पदवी मिळवून पुढे आय ए एस झालेले, भारतीय लोक प्रशासनात एक नवा आदर्श निर्माण करणारे अधिकारी.
विदर्भ कन्या झाली आयएस – अमरावती जिल्ह्यातील एका गावातील मुलगी आय ए एस अधिकारी कशी झाली, त्याची चित्त वेधक कहाणी.
दारू विकणाऱ्या आदिवासी स्त्री चा मुलगा झाला आयएएस – प्रसंगी परिस्थितीचा बाऊ करणाऱ्या, आईवडील, नशीब, परमेश्वर, यांना दोष देणाऱ्यांनी डॉ राजेंद्र भारूड यांचे उदाहरण सदैव आपल्या डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे.
मजुराची मुलगी झाली आयएएस – यशाला गवसणी घालणाऱ्या बंजारा समाजातील स्वाती मोहन राठोड यांची गगन भरारी.
बिच्छू टेकडी ते दिल्ली – अमरावती येथील बिच्छु टेकडी या झोपडपट्टीत राहून गरीब परिस्थितीवर मात करुन यूपीएससी परीक्षेत यश संपादन केलेली पल्लवी चिंचखेडे.
लातूरच्या पहिल्या महिला जिल्हाधिकारी – मराठवाड्यातील पहिल्या महिला उप जिल्हाधिकारी म्हणून निवडल्या गेलेल्या वर्षा ठाकूर घुगे मॅडम यांनी लातूर च्या पहिल्या महिला जिल्हाधिकारी म्हणून ही मान मिळविला.
आधी आयआयटी, मग आयएएस – देशातल्या नामवंत परीक्षा कोणत्याही असोत, अश्या परीक्षांना नुसतेच सामोरे न जाता त्यावर स्वार होऊन विजयी होऊन यश संपादन करणारा ऋषिकेश ठाकरे.
ग्रामकन्या ते आयपीएस – प्रबळ इच्छा शक्ती, कष्ट करण्याची तयारी आणि प्रयत्नात सातत्य ही यशाची त्रिसूत्री तसेच बिकट परिस्थितीत अखंडपणे कार्य करा, जीवनात वेळेचं महत्व ओळखलच पाहिजे, हे सांगणाऱ्या तेजस्वी सातपुते (आयपीएस) यांची तेजस्वी कहाणी.
आशिष चे यश – सर्वसामान्य परिस्थितीत सातत्यपूर्ण अभ्यास करून, जीवनात ठरवलेले ध्येय प्राप्त करून, शैक्षणिक क्षेत्रात साधना करणाऱ्या सामान्य युवकांसमोर एक आदर्श निर्माण करणारा आशिष.
शुभम आयपीएस झालाच ! – जिद्द न हरता, चिकाटीने पाच वेळा युपीएससीची परीक्षा देऊन सहाव्या वेळी आयपीएस झालेल्या सोलापूर जिल्ह्यातील एका गावाच्या शुभम जाधव यांची यश कथा.
दहावी नापास ते माहिती संचालक – ज्यूस सेंटरवर काम करून शिक्षणासाठी धडपडणारा मुलगा पदवीधर होऊन पुढे, पत्रकार, दूरदर्शन निर्माता, माहिती संचालक पदापर्यंत मजल गाठणाऱ्या देवेंद्र भुजबळ यांची प्रेरणादायी कहाणी.
सून आधी झाली फौजदार, मग झाली तहसिलदार – सासरच्या मंडळींची मोलाची साथ आणि हरहुन्नरी, कर्तव्यदक्ष, धडाडीच्या तसेच धाडसी व्यक्तिमत्व लाभलेली आधुनिक हिरकणी म्हणजे प्रिती डूडुलकर.
आई झाली अधिकारी –
स्पर्धा परीक्षेचे वेड, सासर माहेर ची साथ, त्यामूळे शिक्षिका ते राजपत्रित अधिकारी पर्यंत चा प्रवास करणाऱ्या सांख्यिकी उपसंचालक वर्षा भाकरे.
डेअरीबॉय ते सहविक्रीकर आयुक्त – कोल्हापूर जिल्ह्यातील सुळे गावातील एक तरूण वेळ प्रसंगी दूध डेअरीत पडेल ते काम करतो. पुढे कोल्हापूर ला बीए होतो, नंतर मुंबईत येऊन विविध नोकऱ्या करतो आणि ते करत असतानाच एमपीएससी ची परीक्षा देऊन जिद्दीने विक्रीकर अधिकारी होऊन विक्रीकर सहआयुक्त पदा पर्यंत यशस्वी वाटचाल करतो, त्याची प्रेरक कहाणी.
प्लॅन ‘बी’ ने तरलो ! – युपीएससी, एमपीएससी च्या मुख्य परीक्षेत कितीही परिश्रम करून सगळेच यशस्वी होतीलच असे नाहीं म्हणूनच वास्तववादी विचार करून, स्वानुभावर ‘प्लान बी’ तयार असावा, असे सांगताहेत श्री पवन नव्हाडे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, चिंचवड, पुणे
कॅन्टीनबॉय ते जॉइंट सेक्रेटरी – यवतमाळ जिल्ह्यातील लाखखिंड गाव ते पुसदच्या एस टी हॉटेल मध्ये कपबश्या विसळण्याचे काम करीत शिक्षण घेतलेल्या आणि पुढे मंत्रालयात सहायक पदापासून सहसचिव पदापर्यंत पोहोचलेल्या श्री राजाराम जाधव यांचा थक्क करणारा प्रवास.
असे घडले लेफ्टनंट कर्नल महेंद्र सासवडे – अतिशय हुशार, शूर, धाडसी, ज्याने स्व कर्तबगारीने यशाची वाटचाल केली अशा तरुणाचा अंगावर शहारे आणणारा जीवन प्रवास.
आईने घडविल्या आयएएस मुली – जिजाऊ मातेने छत्रपती शिवाजी महाराजांना घडविले तर हेमाली डाबी कांबळे या आधुनिक जिजाऊ ने दोन मुलींना आय ए एस करून दाखविले. अशा मातेची आणि तिच्या मुलींची कहाणी. आईने मुलींच्या शिक्षणाचे महत्व ओळखून स्वतः शिक्षिका बनुन, त्यांचें प्रेरणा स्थान होणाऱ्या आईला नमन.
दोन सख्खे भाऊ झाले आयएएस – गडचिरोली जिल्ह्यातील दोन सख्खे भाऊ सातवी पर्यंत घरात लाईट नसताना शिकतात. त्यापैकी एक जण आय आय टी तून एम टेक होतो तर दुसरा भाऊ व्हेटरनरी डॉक्टर होतो. पुढें दोघेही उपजिल्हाधिकारी होतात आणि यथावकाश आयएएस होतात, ही श्री चंद्रकांत डांगे आणि डॉ प्रदीपकुमार डांगे या बंधूंची अपूर्व कथा.
फर्ग्युसनचे सप्तृषी – भारतातील एकाच कॉलेज मधील सात विद्यार्थी एकाच वेळी यूपीएससी परीक्षा पास होण्याचा विक्रम फर्ग्युसन कॉलेज ने केला आहे.
“दीपस्तंभ”चे नवरत्न – दिव्यांग उमेदवारांकडून स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेण्यासाठी २००५ साली श्री यजुर्वेद महाजन यांनी जळगाव येथे स्थापन केलेल्या दीपस्तंभ संस्थेचे ९ उमेदवार यावेळी युपएससीच्या परीक्षेत यशस्वी झाले. त्यापैकी ५ जण दिव्यांग आहेत. असे हे दीपस्तंभ चे नवरत्न.
दृष्टीहीन झाली बँक अधिकारी – पूर्ण अंधत्वावर, अंधत्वाने आलेल्या नैरश्यावर मात करत अतिशय सक्षमपणे सेवा बजावत सामाजिक जबाबदारी म्हणून डोळे दान करण्याचे ठरविलेल्या सुजाता कोंडिकिरे हीची डोळस कहाणी.
वॉर्डबॉय ते पशुसंवर्धन अधिकारी – समाजाने दिलेले समाजाला परत करणे हे आपले कर्तव्यच आहे, हे सर्वच क्षेत्रातील शासकीय, निमशासकीय आणि अन्य सेवेतील अधिकारी, कर्मचारी यांनी अंगी बाळगणे हीच आजच्या घडीला मोठी देशसेवा ठरेल, असे मानणारे वॉर्डबॉय ते पशूसंवर्धन अधिकारी झालेले डॉ चंद्रकांत हलगे यांची उदात्त कथा.
खेळता खेळता अधिकारी ! – निरोगी व दीर्घायुष्य लाभणे हेच सुखी व समाधानी जीवनाचे खरे रहस्य. तसेच खेळांची आवड असणाऱ्या मुलामुलींना सरकारी नोकरीत कशी संधी आहे, हे सांगणारे क्रीडा अधिकारी श्री महेश खुटाळे.
संघर्षातून झाली अधिकारी – पत्र्याच्या घरात वास्तव्य, पाण्याचा नळ घरात नाही, अशा परिस्थितीवर मात करून फिनिक्स पक्ष्याप्रमाणे यश मिळवणारी प्राजक्ता बारसे.
प्रांजळ अधिकारी प्रांजली– खडतर परिस्थितीने कणखर, स्वावलंबी बनवून लढलेली पोरकी पोर उपसंचालक कौशल्य विभाग पदापर्यंत कशी पोहोचली ही प्रांजली बारस्कर यांची कहाणी.
मी पोलीस अधिकारी झाले – आजपर्यंत घरातील कोणीही नोकरी साठी घराबाहेर पडले नव्हते. पोलिसच काय पण कुठलीही पार्श्वभूमी नव्हती. असे असताना थेट पोलीस सब इन्स्पेक्टर म्हणून निवडल्या गेलेल्या, पुढे पोलीस उप अधीक्षक झालेल्या सुनिता नाशिककर यांची थरारक कथा.
सेल्सगर्ल ते माहिती अधिकारी – स्वतः ज्या परिस्थितीतुन ती गेली त्याची जाण तिने ठेवली. आता ती झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांना मोफत शिकवणी देते. प्रेरणादायी व्यक्ती, संस्था, उपक्रम यावर सातत्याने लिहित असते. कठीण परिस्थितीत स्वतःचा आत्मविश्वास कायम ठेवणारी अशी सेल्सगर्ल ते माहिती अधिकारी झालेली अंजू कांबळे.
आनंदी पापाजी – चांगलें कर्म केले की चांगलें फळ मिळते. स्वतः आनंदाने जगा आणि इतरांनाही आनंदाने जगू द्या, असा जीवन संदेश प्रत्यक्ष कृतीतून देणारे निवृत्त सेना अधिकारी चरणजित सिंग यांची खिलाडू कथा.
ग्रुप कॅप्टन सुधीर निंभोरकर – वर्धा जिल्ह्यातील वडाळा गावातील एका शेतकरी कुटुंबातील तीन भाऊ भारताच्या भूसेना, वायूसेना, नौसेना या तिन्ही दलात एकाच वेळी कार्यरत रहातात, त्या पैकी एका भावाची ही अभिमानास्पद यश कथा.
मराठीने समृध्द केले – मराठी भाषेमुळे इतिहास, संस्कृती, साहित्य, समाजजीवन, याची ओळख झाल्याने आपले जीवन अधिकच समृध्द झाले. प्रत्येकाने मराठीवर प्रेम केले तर मराठी निश्चितच अधिक समृध्द होईल, असे सांगतेय बँक अधिकारी प्रिती कोटियन.
भिकारी ते अधिकारी – मुंबईच्या रस्त्यावर भीक मागणारा, आत्महत्येच्या विचारापर्यंत पोहोचलेला मुलगा रात्रपाळीच्या शाळेत शिकुन महापालिकेत शिपाई होतों आणि पुढे अधिकारी होतो या सुरेश गोपाळे यांची सत्य कथा.
नौसेनिक ते समाजसेवक – ज्याने कधी समुद्र पाहिला नाही तो नौसेनिक होतो पुढे कस्टम खात्यात नोकरी करून स्वेच्छा निवृत्ती पत्करून समाजसेवक होतो, अशा डॉ सुनील अंदूरे यांची साहसी कथा.
जेल सुधरविणारा अधिकारी – कैद्यांसाठी विविध उपक्रम, अत्यंत कार्यक्षम आणि निष्कलंकपणें राबवून राष्ट्रपती पुरस्कार मिळवलेले श्री चंद्रमणी इंदुरकर यांची जीवन कहाणी.
– सौ अलका भुजबळ. 9869484800